अकोला न्युज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी अनुराग अभंग सध्या देशभरासह राज्यात व्हॅलेंटाईन सप्ताहाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेम व्यक्त करण्याच्या या उत्सवात तरुणाई मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत आहे. गुलाब, प्रपोज डे, भेटवस्तू, सोशल मीडियावरील ‘परफेक्ट’ प्रेमकथा यामुळे वातावरण रंगले असले तरी या चमकदार चित्रामागील भावनिक वास्तव वेगळंच असल्याचं चित्र समोर येत आहे.
“हा सप्ताह त्या दिवसानुसार साजरा केलेला बरा, कारण मनाचा आणि आयुष्याचा काही भरोसा ठरत नाही,” हे वाक्य आजच्या पिढीच्या मानसिक अवस्थेवर नेमकं भाष्य करतं. व्हॅलेंटाईन सप्ताह हा जिव्हाळा, आपुलकी आणि भावना व्यक्त करण्याचा काळ असायला हवा; मात्र प्रत्यक्षात अनेक तरुण-तरुणींसाठी तो अपेक्षांचा ताण, नकाराची भीती आणि भावनिक अस्थैर्य घेऊन येताना दिसतो.
‘हाय प्रोफाईल लाईफस्टाईल’, ‘फर्स्ट लव्ह’ आणि ‘फर्स्ट रिजेक्शन’ या संकल्पना वेगाने वाढत असून प्रेमाचा खरा अर्थ आणि आयुष्याची दिशा अनेकदा हरवत चालली आहे. पहिल्याच प्रेमात अपयश आल्यास मानसिक खच, ताणतणाव आणि नैराश्याची लक्षणे वाढताना दिसत आहेत. बाहेरून आनंदी दिसणारे चेहरे आतून मात्र गोंधळलेले असतात.
पूर्वी पालक प्रेमप्रकरणांकडे कठोर नजरेने पाहत असले तरी संयम, वेळ आणि भविष्यावरील विश्वास यामुळे युवक मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर होते. आज मात्र एकतर्फी प्रेम, चुकीच्या अपेक्षा आणि अयोग्य वेळेला व्यक्त झालेल्या भावना अनेकांना महागात पडत आहेत.
नकार म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो. संयम, पर्याय आणि प्रतीक्षा हेच भावनिक परिपक्वतेचे आधारस्तंभ आहेत. म्हणूनच व्हॅलेंटाईन सप्ताह साजरा करताना दिवसांच्या ट्रेंडपेक्षा भावनांची मर्यादा, मानसिक आरोग्य आणि वास्तवाचा विचार करणं अधिक महत्त्वाचं ठरत आहे.









