Ads

बस प्रवासात सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; बुलढाणा LCB कडून महिलांची टोळी जेरबंद — २ लाखांचे दागिने जप्त

By Nilesh Sir

February 10, 2026 4:34 pm

Ads

बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या पिशव्यांमधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीचा बुलढाणा जिल्ह्यात पर्दाफाश झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने चार महिलांना अटक केली आहे. या कारवाईत अंदाजे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फेमिना बी नूर मोहम्मद या देऊळगाव राजा ते देऊळगाव मही दरम्यान बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने असलेले पाकीट अज्ञात महिलांनी चलाखीने लंपास केले. चोरीची घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने देऊळगाव राजा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.


तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती आणि परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढला. तांत्रिक विश्लेषण आणि हालचालींचा तपास करत पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील चार महिलांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नंदिनी सुरी गड्डी, पार्वती राकेश गड्डी, कस्तुरी राम गड्डी आणि लक्ष्मी व्यंकटेश मच्छा यांचा समावेश आहे.


फिर्यादी महिलेने आरोपींची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी त्यांना औपचारिक अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले अंदाजे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.


दरम्यान, बस प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

No comments to show.

Leave a Comment