बुलढाणा घरफोडी प्रकरणाचा उलगडा; तीन गुन्ह्यांची कबुली

बुलढाणा शहरात घरफोडीच्या वाढत्या घटनांदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मलकापूर रोड परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत आरोपीकडून तब्बल 1 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे.


पाळत ठेवून घरफोडी

मलकापूर रोड परिसरात वास्तव्यास असलेले सचिन खिल्लारकर हे कुटुंबासह अवघ्या अर्ध्या तासासाठी बाहेर गेले असताना आरोपीने घरावर पाळत ठेवून संधी साधली. घरात घुसून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.


आरोपी पोलिसांच्या ताब्यात


तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान जोहर नगर परिसरातील शेख अरबाज उर्फ मेमरी शेख मेहमूद याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने संबंधित घरफोडीची कबुली दिली.


तीन गुन्ह्यांची उकल


पोलिस तपासात आरोपीने आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये दुसऱ्या ठिकाणी घरफोडी तसेच दुचाकी चोरीचा समावेश आहे. त्यामुळे एकूण तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.


मुद्देमाल जप्त


आरोपीकडून चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण 1 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मालमत्तेमुळे गुन्ह्याची साखळी उघड होण्यास मदत झाली आहे.


पोलिस पथकाची कारवाई


ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे, संदीप कायंदे, अनिता आराख, विशाल बनकर आणि विनोद बोरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांच्या तत्पर तपासामुळे घरफोडी प्रकरणाचा अल्पावधीत उलगडा झाला.

Leave a Comment