तीर्थक्षेत्र शेगाव हादरले! दर्शनासाठी आलेल्या १९ वर्षीय युवतीवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

संतनगरी शेगाव शहरातून एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सवानिमित्त ३ फेब्रुवारीपासून शेगावमध्ये राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असतानाच या पवित्र तीर्थक्षेत्रात घडलेल्या घटनेमुळे वातावरण संतप्त झाले आहे. दर्शनासाठी आलेल्या १९ वर्षीय युवतीला विश्वासात घेऊन एका तरुणाने मंदिर परिसरातील लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने युवतीशी ओळख वाढवत तिला फसवणुकीने संत गजानन महाराज मंदिर परिसरातीलच एका लॉजवर नेले. त्या ठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.

घटनेनंतर धैर्य दाखवत पीडित युवतीने तात्काळ शेगाव शहर पोलीस ठाणे गाठले आणि सविस्तर तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत मंदिर परिसरातून आकाश सोनाजी भामरे या आरोपीस अटक केली.

युवतीच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 80/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 351(2)(BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कलम 3(1)(W), 3(1)(W)(2), 3(2)(V) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे संत गजानन महाराजांच्या पवित्र नगरीची प्रतिमा मलिन झाल्याची भावना व्यक्त होत असून शेगावसह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर भाविक येत असताना शहरातील कायदा व सुव्यवस्था, तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment