अकोट : पवित्र श्रावणातील तिसरा सोमवार म्हणजे महादेव भक्तांसाठी श्रद्धेचा आणि भक्तीचा विशेष दिवस. याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र धारगड दर्शन यात्रा २०२६ येत्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सातपुड्याच्या कुशीत, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या धारगड येथील गुहेतील प्राचीन शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
निसर्गसौंदर्य आणि अध्यात्माचा अनोखा संगम असलेली धारगड महादेव यात्रा अकोटसह परिसरातील भाविकांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानली जाते. हिरव्यागार सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गुहेत प्राचीन शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने धारगडकडे मार्गस्थ होतात.
टायगर रिजर्वमुळे वर्षभर प्रवेश बंद!
धारगड परिसर टायगर रिजर्व क्षेत्रात येत असल्याने वर्षभर या भागात जाण्या-येण्यास परवानगी नसते. मात्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी वन विभागाकडून ठरावीक अटी व नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जातो.
यंदाही भाविकांनी वन विभागाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकोट विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अकोट आणि धारगड सेवा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
२८ वर्षांची महाप्रसादाची परंपरा कायम!
धारगड यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेला भव्य महाप्रसाद. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अकोट आणि परिसरातील दानशूर दात्यांच्या सहकार्याने यंदाही भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना
टी-पॉईंटपर्यंतच वाहनाने जाण्याची परवानगी राहणार आहे. त्यानंतर भुयारापर्यंतचा प्रवास भाविकांना पायी करावा लागणार आहे.
धारगड परिसरात प्लास्टिक बंदी असल्याने प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांना बंदी राहणार आहे. तसेच हार, फुले आणि प्रसादाचे साहित्य भाविकांनी आपल्या गावातूनच सोबत आणावे.
प्रवेशाची वेळ आणि शुल्क
३० ऑगस्ट २०२६, रविवार सकाळी ७ वाजल्यापासून ते ३१ ऑगस्ट २०२६, सोमवार दुपारी ३ वाजेपर्यंत खटकाळी गेटपासून धारगडकडे जाण्याची परवानगी राहणार आहे.
प्रवेश शुल्क :
- दुचाकी – ₹३०
- छोटी चारचाकी – ₹६०
- मोठी चारचाकी – ₹७०
सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशीत, गुहेतील प्राचीन शिवलिंगाचे दर्शन आणि महादेवाच्या भक्तीत तल्लीन होण्याची ही पर्वणी भाविकांसाठी विशेष ठरणार आहे. श्रद्धेची पावले धारगडकडे वळणार असून, ३१ ऑगस्टला सातपुड्यात ‘हर हर महादेव’चा जयघोष घुमणार आहे!






Leave a Comment