Ads

पत्नीने यकृत दान करून वाचवले पतीचे प्राण; मुख्य मंत्री सहायता निधीच्या आर्थिक मदतीमुळे प्रशांत इंगळेंना मिळाले नवजीवन

By Nilesh Sir

August 5, 2026 5:27 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 5 जुलै 2026 :- अकोल्यातील एका सर्वसामान्य कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा किरण ठरलेली ही घटना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आर्थिक अडचणींमुळे लाखो रुपयांचा उपचार अशक्य वाटत असतानाच पत्नीने स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले. त्याचवेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे हे खर्चिक यकृत प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पडले.

अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) हे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे तपासण्या केल्यानंतर त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी होत असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. मात्र, २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता.

अशा कठीण प्रसंगी पत्नी वर्षा इंगळे यांनी कोणतीही तमा न बाळगता स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक मदतीसाठी कुटुंबीयांनी लोकप्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २ लाख रुपये मंजूर करण्यात आले. तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची मदत मिळाली. अशाप्रकारे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने मुंबईतील नानावटी रुग्णालयात २५ जून २०२६ रोजी यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतर प्रशांत इंगळे यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आणि १३ जुलै २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्ववत होत आहेत.

वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आणि पत्नीच्या त्यागामुळे आपल्याला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त करत इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच टाटा ट्रस्ट यांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रेम, त्याग आणि वेळेवर मिळालेली मदत एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रशांत आणि वर्षा इंगळे यांची ही हृदयस्पर्शी कहाणी.

Related Article

पत्नीने यकृत दान करून वाचवले पतीचे प्राण; मुख्य मंत्री सहायता निधीच्या आर्थिक मदतीमुळे प्रशांत इंगळेंना मिळाले नवजीवन

दोन वर्षांनंतर गतीमंद मुलीची आईशी भावनिक भेट; महिला व बालविकास विभागाच्या प्रयत्नांना यश

माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांची प्रकृती स्थिर;, मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा, गंभीर शस्त्रक्रियेवर जिद्दीने मात

Bollywood Newsगजनी’चा खलनायक हरपला! ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन

अकोट ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोर्डी–उमरा बीटमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट? पोलिस अधीक्षकांच्या कारवाईकडे लक्ष

हेल्मेटवर धडक कारवाई… पण ‘स्कूल बस’च्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!