अकोट ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरा बीट नेमके कायद्याच्या ताब्यात आहे की कथित अवैध धंदे करणाऱ्यांच्या प्रभावाखाली, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. बोर्डी, उमरा, वडाई सटवाई फाटा, सूतगिरणीसमोरील काटा, पिंपरी आणि आसपासच्या भागात कथित अवैध धंदे सुरू असल्याचे आरोप होत असताना, अपेक्षित पोलिस कारवाई दिसत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
बोर्डीच्या आठवडी बाजार परिसरात अंगणवाडी, उर्दू शाळा, पोस्ट ऑफिस, सरकारी दवाखाना, मशीद आणि ऑटो स्टॉपसारखी महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे आहेत. अशा ठिकाणांच्या परिसरातही कथित अवैध व्यवहार सुरू असल्याची चर्चा होत असेल, तर कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अकोली जहागीर–पनज मार्गावरून मोटारसायकलींच्या माध्यमातून कथित अवैध दारूचा पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा! आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.
आता नागरिकांची नजर अकोला जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांकडे लागली आहे. या प्रकरणात विशेष पथक नेमून अचानक धाडी टाकल्या जाणार का? वस्तुस्थिती जनतेसमोर आणली जाणार का? की नागरिकांचे प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरितच राहणार, अशी चर्चा सुरू आहे.
कायद्याची भीती गुन्हेगारांच्या मनात असली पाहिजे, सामान्य नागरिकांच्या मनात नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करणे हीच काळाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.







Leave a Comment