Ads

ओपन-जेवू देईना, क्लोज-झोपू देईना’; अकोटमधील अवैध मटक्यावर पोलिस अधीक्षक अंकुश लावणार का?

By Nilesh Sir

August 4, 2026 6:36 am

Ads

ओपन जेवू देईना आणि क्लोज झोपू देईना…’ हे जुने वाक्य सध्या अकोट तालुक्यातील काही भागांतील परिस्थितीवर लागू पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या हद्दीतील काही पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध मटका व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या धंद्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी वाढत असून, संबंधित यंत्रणेकडून कठोर पावले उचलली जातील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मटक्याचे अड्डे दिवस-रात्र सुरू असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होत आहे. अल्पावधीत पैसे मिळविण्याच्या मोहात अनेक तरुण आणि कष्टकरी नागरिक या जुगाराकडे वळत आहेत. मात्र, या मोहाचा शेवट बहुतांश वेळा आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक कलहात होत असल्याचे नागरिक सांगतात.

विशेषतः अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरा गावात मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. जसा आठवडी बाजार भरतो, त्याचप्रमाणे येथे रोज मटक्याचा व्यवहार सुरू असल्याचे चित्र दिसते. या संदर्भात प्रभावी कारवाई होत नसल्याची खंतही व्यक्त केली जात आहे.

याचप्रमाणे अकोट शहरातील काही भागांत टिनपत्र्याच्या खोल्यांमधून तसेच काही सार्वजनिक ठिकाणी टेबल लावून मटका सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच दहीहंडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील काही गावांमध्येही मटका व्यवसाय वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे

मटक्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रोजंदारीवर काम करणारे अनेक जण “ओपन” आणि “क्लोज”च्या नादात आपली कमाई गमावत असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ कायद्याचा नसून सामाजिक आणि आर्थिक चिंतेचाही विषय बनला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीत पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली आहे. हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करून अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. याच धर्तीवर अवैध जुगार, मटका, गुटखा आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवरही तितक्याच कठोरपणे कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांचा सवालही तितकाच महत्त्वाचा आहे—जर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई होऊ शकते, तर समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या पोखरणाऱ्या अवैध जुगारावरही तितक्याच प्रभावीपणे कारवाई का होऊ नये?

दरम्यान, काही नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत असले, तरी या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संबंधित पोलीस अधिकारी किंवा प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्तीबाबत ज्या प्रकारे स्पष्ट आदेश देत संपूर्ण जिल्ह्यात मोहीम राबवली, त्याचप्रमाणे अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीम जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

अवैध मटका व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांनी सातत्यपूर्ण छापे, गुप्त माहितीच्या आधारे कारवाया आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. या प्रकरणी प्रशासनाने वस्तुस्थिती तपासून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केल्यास नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!