Ads

आईच्या कर्करोग उपचारादरम्यान फ्लॅटवर बेकायदेशीर कब्जाचा आरोप; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

By Nilesh Sir

July 31, 2026 12:39 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो | दिनांक ३१ जुलै २०२६ :- अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फ्लॅटवर बेकायदेशीररित्या कब्जा केल्याचा आरोप करत दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मालमत्तेचा व्यवहार, कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश, धमक्या आणि वादग्रस्त दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे.

फिर्यादी परिणय रविंद्र दुबे (वय ३३, रा. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील स्व. रविंद्र दुबे यांच्या निधनानंतर रामदासपेठ येथील अक्षय अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३ हा त्यांच्या कुटुंबाच्या वारसांच्या नावावर आहे. आईच्या कर्करोगाच्या उपचारासाठी आर्थिक गरज निर्माण झाल्याने संबंधित फ्लॅटचा व्यवहार २५ लाख रुपयांत निश्चित करण्यात आला होता. त्यापैकी एक लाख रुपये टोकन रक्कम देण्यात आली होती, तर उर्वरित रक्कम कर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

तक्रारीनुसार, उर्वरित रक्कम वेळेत न मिळाल्याने व्यवहार पूर्ण झाला नाही. दरम्यान, आईच्या उपचारासाठी गुजरात आणि नागपूर येथे जावे लागल्याने फ्लॅटला कुलूप लावून कुटुंब बाहेरगावी गेले होते. १२ जून २०२६ रोजी परत आल्यानंतर फ्लॅटचे कुलूप तोडून संबंधित दाम्पत्य तेथे वास्तव्यास असल्याचे आढळल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

याबाबत जाब विचारला असता शिवीगाळ, धमक्या तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच आईच्या गंभीर आजाराचा गैरफायदा घेत मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा केल्याचा आणि विजेचा अनधिकृत वापर केल्याचाही दावा फिर्यादीने केला आहे.

रामदासपेठ पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून, मालमत्तेची कागदपत्रे, व्यवहाराशी संबंधित दस्तऐवज आणि दोन्ही पक्षांचे दावे पडताळून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोप हे तक्रारीवर आधारित असून, संबंधित आरोपींची भूमिका अद्याप सार्वजनिकरीत्या समोर आलेली नाही.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!