विदर्भातील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्यावर स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शोध लावले असून, त्यामध्ये अंदाजे १२ ते १५ फूट लांबीची लोखंडी ऐतिहासिक तोफ, इतिहासात नोंद नसलेला दुर्गम दरवाजा तसेच गणेश व नंदीच्या प्राचीन भग्नावस्थेतील मूर्तींचा समावेश आहे. या शोधांमुळे गाविलगड किल्ल्याच्या लष्करी व स्थापत्य इतिहासाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
इतिहास संवर्धनाच्या उद्देशाने स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते किल्ल्याच्या दुर्गम भागाची पायपीट करून पाहणी करत असताना किल्ल्याच्या पश्चिमेकडील मोझरी बुरुजाजवळ तटबंदीलगत असलेल्या खोल खाडीत अंदाजे १२ ते १५ फूट लांबीची लोखंडी ऐतिहासिक तोफ पडलेल्या अवस्थेत आढळून आली. वनमजूर संजू बेलसरे यांनी तटबंदीच्या बाहेरील बाजूस तोफसदृश वस्तू असल्याची माहिती दिल्यानंतर संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली आणि ही तोफ समोर आली. अनेक वर्षांपासून गंज, माती, झाडी व नैसर्गिक आपत्तींच्या विळख्यात अडकलेली ही तोफ सध्या खाडीत पडून असून तिचे तोंड खाडीच्या दिशेने आहे. हा शोध गाविलगडच्या लष्करी इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या ऐतिहासिक शोधाची माहिती स्वराज्य सेवा प्रतिष्ठानने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), नागपूर विभागाला लेखी स्वरूपात दिली असून, तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने पाहणी करून सुरक्षितरीत्या तोफ बाहेर काढावी, तिचे वैज्ञानिक संवर्धन करावे व माहितीफलकासह गाविलगड किल्ल्यावर किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी जतन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या शिवा काळे, प्रतीक पाथरे, राकेश महल्ले व किरण मोरे यांनी गाविलगड किल्ल्याच्या अतिदुर्गम भागात इतिहासात कुठेही उल्लेख अथवा अधिकृत नोंद नसलेला एक प्राचीन दरवाजा शोधून काढला होता. हा दरवाजा किचक दरवाज्याच्या खालील बाजूस असून अत्यंत अवघड आणि धोकादायक परिसरात बांधण्यात आलेला आहे. त्याची रचना रायगड किल्ल्यावरील प्रसिद्ध वाघ दरवाजाशी साधर्म्य दर्शविणारी असल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. या दरवाज्याच्या खाली खोल खाडी असल्यामुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक मानला जातो.
याशिवाय, गाविलगड किल्ल्याच्या मध्यभागी गणेश व नंदीच्या सुंदर परंतु भग्नावस्थेतील प्राचीन मूर्तींचाही शोध स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या चमूने लावला आहे. या मूर्ती किल्ल्याच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात, असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे.

स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवा श्रीकृष्णराव काळे यांनी सांगितले की, “गाविलगड किल्ल्यावरील हे सर्व शोध आपल्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहेत. ही तोफ, प्राचीन दरवाजा आणि मूर्ती केवळ पुरातत्त्वीय अवशेष नसून आपल्या इतिहासाच्या जिवंत साक्षी आहेत. या वारशाचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन व्हावे यासाठी आम्ही पुरातत्त्व विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत.

या शोधमोहीमेत शिवा काळे, प्रतीक पाथरे, राहुल पंडित, राकेश महल्ले, अनुप लांबट, संजू बेलसरे, बाळू देशमुख, आर्किटेक निलेश दौड आणि प्रवीण काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
गाविलगड किल्ल्यावर सातत्याने होत असलेल्या या ऐतिहासिक शोधांमुळे इतिहास अभ्यासक, पुरातत्त्व संशोधक आणि दुर्गप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, संबंधित शासकीय यंत्रणांनी या सर्व अवशेषांचे तातडीने सर्वेक्षण, नोंदणी आणि संवर्धन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.






Leave a Comment