अकोट तालुक्यातील वस्तापूर-मानकरी शेतशिवारात 60 वर्षीय शेतमजुरावर रानडुकराने जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, आता तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथे 18 वर्षीय युवकावरही रानडुकराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच दिवशी दोन तालुक्यांत घडलेल्या या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोट तालुक्यातील वस्तापूर-मानकरी शेतशिवारात शेतात काम करत असताना रमेश शिवराम कासदे (वय 60) यांच्यावर रानडुकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
ही घटना घडल्यानंतर काही तासांतच तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथे 18 वर्षीय राहुल विनोद सरदार रा: पाथर्डी ता: तेल्हारा युवकावरही रानडुकराने हल्ला केल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या पावसाळ्याच्या दिवसांत जंगल परिसरातून रानडुकरांचा शेतशिवाराकडे वाढता वावर दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांचे नुकसान तर होतच आहे, शिवाय मानवी जीवितालाही धोका निर्माण होत असल्याने वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
एकाच दिवशी अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांत झालेल्या रानडुकरांच्या हल्ल्यांमुळे वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. प्रशासन आणि वन विभागाने तातडीने या घटनांची दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.






Leave a Comment