Ads

मासिक सभा न घेतल्याने सरपंच अपात्र; अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, आगेखेड ग्रामपंचायतीत खळबळ

By Nilesh Sir

July 24, 2026 8:59 pm

Ads

ANN News Network | अकोला स्वप्नील सुरवाडे प्रतिनिधी पातूर, दि. २४ जुलै : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आगेखेड ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन काशीराम टप्पे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम ३६ अंतर्गत सरपंचपदासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा आदेश दिल्याने ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या आवश्यक मासिक सभा नियमितपणे न घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई ग्रामस्थ सुभाष समाधान अवचार यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जावर सुनावणी झाल्यानंतर करण्यात आली. अर्जदारांच्या वतीने अॅड. विनीत शिरसाट यांनी युक्तिवाद करत ग्रामपंचायतीच्या मासिक सभा घेणे ही कायदेशीर जबाबदारी असल्याचे निदर्शनास आणून दिले. ग्रामपंचायतीचे इतिवृत्त, सभा नोटिसा, अधिकाऱ्यांचे अहवाल आणि इतर अभिलेखांच्या आधारे मार्च २०२३ ते जून २०२३ या कालावधीत आवश्यक सभा घेण्यात आल्या नसल्याचा दावा त्यांनी मांडला.

सुनावणीदरम्यान सरपंच गजानन टप्पे यांनी सभा झाल्याचा दावा केला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध कागदपत्रांची तपासणी केली असता त्या दाव्याला पुष्टी देणारा ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच सभा नोटिसा आणि इतिवृत्तामध्ये विसंगती आढळल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ३६ नुसार, सरपंच किंवा उपसरपंचाने नियमानुसार ग्रामपंचायतीच्या सभा न बोलावल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करता येते. या तरतुदीचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ३० जानेवारी २०२५ रोजी दाखल झालेला अर्ज मंजूर करत सरपंच गजानन टप्पे यांना पदासाठी अपात्र घोषित केले.

या निर्णयामुळे आगेखेड ग्रामपंचायतीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कायदेशीर जबाबदाऱ्यांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा हा निर्णय मानला जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!