अकोला | प्रतिनिधी : अकोला शहरात अनेक वर्षांपासून स्वतःला “सरकार की बेटी” म्हणून ओळख देणाऱ्या सत्यशीला बनसोड यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच शहरभर हळहळ व्यक्त करण्यात येत असून, अकोल्याने एक वेगळे आणि सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सत्यशीला बनसोड या अकोला शहरातील एक परिचित चेहरा होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह शहरातील विविध भागांत त्या नेहमी फिरताना दिसत असत. त्यांच्या विलक्षण स्मरणशक्तीमुळे शहरातील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे क्रमांक त्यांना सहज लक्षात राहत. त्यामुळे अनेक नागरिक त्यांचे कौतुक करत असत.
रस्त्यात भेटणाऱ्या लोकांशी सहज संवाद साधणे, गप्पा मारणे आणि कधी अचानक गाणी गाऊन उपस्थितांचे मनोरंजन करणे, हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता. त्यांच्या या निरागस आणि वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे अनेकांनी त्यांना प्रेमाने “अकोल्याची रानू मंडल” अशी ओळख दिली होती.
सत्यशीला बनसोड या कोणत्याही पदावर किंवा प्रसिद्धीच्या झोतात नसल्या तरी त्यांच्या आगळ्यावेगळ्या स्वभावामुळे त्या अकोलेकरांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करून गेल्या होत्या. त्यांच्या निधनाने शहरातील अनेक नागरिकांनी दुःख व्यक्त केले असून, सोशल मीडियावरही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
सत्यशीला बनसोड यांच्या निधनाने अकोला शहराने एक अनोखे, निरागस आणि कायम स्मरणात राहणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या आठवणी अकोलेकरांच्या मनात दीर्घकाळ जिवंत राहतील.






Leave a Comment