Ads

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर आधार आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करा

By Nilesh Sir

June 27, 2026 11:12 am

Ads

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक आयडीची माहिती संबंधित बँक किंवा सेवा सहकारी संस्थेकडे तातडीने जमा करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकित पीककर्जाची माफी मिळणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी प्रथम अतिरिक्त रक्कम भरल्यानंतरच दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही एकत्रित थकबाकीवर ५० हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ दिला जाणार आहे.

याशिवाय, सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीककर्ज घेऊन नियमानुसार वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पीककर्जाची रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान पाच हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेत सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि खासगी बँकांकडून १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पीककर्ज, पुनर्गठन व फेरपुनर्गठन कर्जाचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे यांनी पात्र शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ज्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करून आवश्यक माहिती संबंधित बँक शाखा किंवा सेवा सहकारी संस्थेकडे जमा करावी. अन्यथा योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

No comments to show.

Leave a Comment