Ads

NEET प्रवेशपत्रात मोठा गोंधळ! नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबुधाबी परीक्षा केंद्र;

By Nilesh Sir

June 20, 2026 10:04 am

Ads

देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षेच्या आयोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षीच्या पेपरफुटी प्रकरणानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यंदा अधिक सतर्क असल्याचा दावा करत असताना, नागपूरमधील एका विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रातील धक्कादायक चुकीमुळे परीक्षार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्मण झाले आहे.

नागपूरमधील अब्दुल्ला या विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रासाठी नागपूर, वर्धा किंवा भंडारा हे पर्याय निवडले होते. मात्र, त्याला मिळालेल्या प्रवेशपत्रावर चक्क संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अबुधाबी हे परीक्षा केंद्र नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या प्रकारामुळे विद्यार्थी संभ्रमात पडला असून, नेमकी परीक्षा कुठे द्यायची, असा गंभीर प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्याने NTA हेल्पलाइनकडे धाव

या गंभीर त्रुटीनंतर संबंधित विद्यार्थ्याने NTA च्या हेल्पलाइनशी संपर्क साधून तक्रार नोंदवली आहे. परीक्षा केंद्र तातडीने बदलून द्यावे, अशी मागणी त्याने केली आहे. मात्र, परीक्षा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे.

पेपरफुटीनंतरही गोंधळ कायम

गेल्या वर्षीच्या पेपरफुटी प्रकरणामुळे NEET परीक्षा आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी NTA ने अनेक सुधारणा आणि सुरक्षा उपाययोजना केल्याचा दावा केला होता. मात्र, प्रवेशपत्रातच अशा प्रकारच्या गंभीर चुका होत असतील तर परीक्षेच्या संपूर्ण व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नको

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेतात. अशा परिस्थितीत तांत्रिक चुका, व्यवस्थापनातील त्रुटी आणि प्रशासनातील हलगर्जीपणाचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर बसू शकतो.

जर वेळेत परीक्षा केंद्र दुरुस्त झाले नाही, तर संबंधित विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे NTA ने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्याला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

विद्यार्थी आणि पालकांचा सवाल

“पेपरफुटी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, पण प्रवेशपत्रातील अशा गंभीर चुका थांबणार कधी?”

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या NEET परीक्षेचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

No comments to show.

Leave a Comment