Ads

माय-लेकराची अखेरची आंघोळ ठरली जीवघेणी; मंगरूळ कांबळे डॅम परिसरात हृदयद्रावक घटना

By Nilesh Sir

June 11, 2026 5:22 pm

Ads

सकाळी देवदर्शनासाठी निघालेली माय आणि तिचा लाडका मुलगा संध्याकाळी गावात परतले ते कायमच्या शांततेत…” मंगरूळ कांबळे डॅम परिसरात घडलेल्या या दुर्दैवी दुर्घटनेने समशेरपूर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अक्करमास निमित्त स्नानासाठी गेलेल्या आई-मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मंगरूळ कांबळे डॅम परिसरात गुरुवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अक्करमास निमित्त स्नान व पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांपैकी एका महिलेसह तिच्या 10 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन महिला गंभीर जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगरूळ कांबळे डॅमचे पाणी समशेरपूर परिसरापर्यंत पसरले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे असल्यामुळे नागरिक आंघोळ, पूजा-अर्चा तसेच विरंगुळ्यासाठी येत असतात. अक्करमास सुरू असल्याने समशेरपूर गावातील सुमारे 10 ते 15 महिला गुरुवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास स्नानासाठी डॅम परिसरात गेल्या होत्या.

यावेळी अचानक घडलेल्या दुर्घटनेत ऋषाली हरिदास खोत (वय 35 वर्षे) आणि त्यांचा मुलगा स्वराज हरिदास खोत (वय 10 वर्षे) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आई आणि मुलाचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण समशेरपूर गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या मिराबाई श्यामसुंदर चौधरी (वय 45 वर्षे) आणि माधुरी उमेश खोत (वय 35 वर्षे) या महिलादेखील पाण्यात अडकल्या. त्यांना गंभीर अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी अकोला येथील मुख्य शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महसूल प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाही करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी डॅम परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेषतः खोल पाण्याच्या ठिकाणी इशारा फलक, सुरक्षा जाळी आणि बचाव पथकांची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू असून, नागरिकांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी, नाले आणि डॅम परिसरात जाताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Article

मामू लेट जा, तेरी तो वाट लगने वाली है! अकोला रेल्वे प्लॅटफॉर्मवर चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती

शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांना महागाईचा धक्का! वह्या-पुस्तकांसह शालेय साहित्य महागले

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोल्यात भव्य वृक्षारोपण; ‘ग्रामीण स्वयंरोजगार शिक्षण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

मान्सूनपूर्व मोठी तयारी! पोपटखेडमध्ये SDRF चे विशेष आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पळसखेड नागो येथे भव्य वृक्षारोपण; आमदार संजय गायकवाड यांचे पर्यावरण संवर्धनाचे आवाहन

अकोला-दर्यापूर रोडवर भीषण अपघात : पती-पत्नीचा जागीच मृत्यू; 2 तासांत ट्रक चालक व क्लिनर पोलिसांच्या ताब्यात

No comments to show.

Leave a Comment