Ads

तुकाराम मुंडेंचा पुढचा टार्गेट अकोट तालुक्यातील नाश्ता सेंटर असणार का?;

By Nilesh Sir

June 19, 2026 7:48 am

Ads

एकीकडे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात औषध दुकाने, दूध डेअरी, गुटखा विक्री आणि अन्न सुरक्षेबाबत धडक कारवाईची मोहीम उघडली आहे. मात्र दुसरीकडे अकोट शहर आणि तालुक्यातील अनेक नाश्ता सेंटरमध्ये सुरू असलेल्या अस्वच्छ कारभाराकडे अद्याप प्रशासनाचे लक्ष गेलेले दिसत नाही. त्यामुळे आता अकोटमधील नाश्ता सेंटर हा तुकाराम मुंडेंचा पुढचा टार्गेट ठरणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अकोट तालुक्यातील अकोला रोड, देवरी फाटा, चोहोट्टा बाजार, गांधींग्राम,हिवरखेड रोड, दर्यापूर रोड, अंजनगाव रोड तसेच शहरातील अनेक गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणात नाश्ता सेंटर खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी कचोरी, समोसे, पोहे, भजी, वडे, जलेबी, चहा आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. मात्र अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.

अनेक नाश्ता सेंटरमध्ये काळपट झालेल्या कढया, वारंवार वापरले जाणारे तेल, उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ आणि धूळ-मातीच्या वातावरणात सुरू असलेली अन्न निर्मिती हे चित्र चिंताजनक आहे. याशिवाय खाद्यपदार्थ तयार करणारे कारागीर कोणतेही हातमोजे, हेड कॅप, एप्रन किंवा सुरक्षितता साहित्य न वापरता काम करत असल्याचे दिसून येते.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी नाल्यांच्या शेजारी, वाहतुकीच्या धुळीत आणि अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत. दररोज शेकडो नागरिक आणि विद्यार्थी येथे नाश्ता करत असतात. त्यामुळे एखादा संसर्गजन्य आजार पसरल्यास त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमानुसार प्रत्येक खाद्य व्यवसायाकडे आवश्यक परवाना असणे, स्वच्छता राखणे, सुरक्षित अन्न हाताळणी करणे आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभरात धडक कारवायांचा सपाटा लावला आहे. अनेक मेडिकल स्टोअर्स, दूध डेअरी आणि गुटखा विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांची अपेक्षा अकोटकडे लागली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, कारवाई ही केवळ मर्यादित न राहता सर्वच छोट्या मोठया अस्वच्छ खाद्य व्यवसायावरही झाली पाहिजे. कारण नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांमध्ये कोणतीही तडजोड होऊ शकत नाही.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून शहरातील नोंदणीकृत आणि विनापरवाना सुरू असलेल्या नाश्ता तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अकोटमधील ही परिस्थिती केवळ स्वच्छतेचा मुद्दा नसून थेट सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे आता प्रशासन जागे होणार का? आणि तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईची झळ अकोटमधील नियमबाह्य नाश्ता सेंटरपर्यंत पोहोचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Article

No comments to show.

Leave a Comment