Ads

पातूर नगर परिषद निवडणूक २०२६ : योद्धा विकास मंचचा वरचष्मा; काँग्रेसची कोंडी, भाजपची जोरदार मुसंडी

By Nilesh Sir

June 19, 2026 2:52 pm

Ads

ANN & GTPL News Network, अकोला प्रतिनिधी : स्वप्निल सुरवाडे दि. १९ जून २०२६ पातूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. येत्या २० जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज (१९ जून) सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपणार असल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटचा जोर लावला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून पातूरमध्ये आरोप-प्रत्यारोप, पदयात्रा, प्रचारसभा आणि शक्तीप्रदर्शनाची रणधुमाळी सुरू होती. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी विविध पक्षांकडून मोठ्या रॅली काढून आपापली ताकद दाखविण्याची तयारी करण्यात आली आहे.

पातूरच्या राजकारणाला नवे वळण

या निवडणुकीत पारंपरिक राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी युती केली आहे.

दुसरीकडे, पातूरमधील काही ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी पक्षीय सीमा बाजूला ठेवत योद्धा विकास मंच, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युतीचा नवा प्रयोग मतदारांसमोर मांडला आहे. या नव्या राजकीय समीकरणामुळे पातूरच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले असून काँग्रेस-उबाठा आघाडीसाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे.

काँग्रेससमोर मोठे आव्हान

राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडणुकीत काँग्रेसची कोंडी होताना दिसत आहे. भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. दुसरीकडे, विविध समाजघटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न योद्धा विकास मंचाकडून केला जात आहे.

मुस्लिम, बौद्ध आणि हिंदू मतांची सांगड घालण्याचा प्रयत्न या आघाडीकडून करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांचे समीकरण बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

मुस्लिम मतांवरही परिणाम होण्याची शक्यता

शिवसेना (शिंदे गट) मध्ये माजी नायब तहसीलदार तथा माजी प्रभारी मुख्याधिकारी सैय्यद एहसानोद्दीन यांनी प्रवेश केल्याने आणि मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्यात आल्याने त्याचा थेट परिणाम पारंपरिक मतदानावर होण्याची चर्चा रंगली आहे.

यामुळे अनेक ठिकाणी मतांचे विभाजन होऊन निवडणुकीची लढत अधिक चुरशीची बनली आहे.

अध्यक्षपदासाठी रंगणार थेट सामना

यावेळी भाजपचे अध्यक्षपदाचे उमेदवार सचिन ढोणे आणि योद्धा विकास मंचाचे अध्यक्षपदाचे उमेदवार हाजी सैय्यद बुऱ्हाण यांच्यात थेट लढत होणार असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेस-उबाठा आघाडीचे उमेदवार हिदायत खान यांच्यासमोर अनेक राजकीय आव्हाने उभी ठाकली आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजप आणि योद्धा विकास मंच यांच्यात प्रमुख लढत होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

प्रचार थांबणार, छुप्या बैठकींना वेग

आज सायंकाळी साडेपाच वाजता अधिकृत प्रचार संपल्यानंतर विविध पक्षांच्या छुप्या बैठका, मतदारांशी संपर्क आणि शेवटच्या क्षणातील रणनीतींना वेग येणार आहे. त्यामुळे आजची रात्र अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

उद्या २० जून रोजी मतदान पार पडणार असून सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आता पातूरकर नेमका कुणाच्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Related Article

No comments to show.

Leave a Comment