Ads

मामू लेट जा, तेरी तो वाट लगने वाली है! अकोला रेल्वे प्लॅटफॉर्मवर चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती

By Nilesh Sir

June 9, 2026 6:26 pm

Ads

अकोला: गेल्या काही महिन्यात तुम्ही अकोला रेल्वे स्टेशनवर पाय ठेवलाय का? आणि ठेवला असेल तर तुमचे खिसे, मोबाईल आणि सामान सुरक्षित आहे का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, कारण अकोला रेल्वे स्टेशन आता प्रवाशांसाठी नाही, तर चोरांसाठी ‘सेफ झोन’ बनले असून रेल्वे पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

चोरांचे ‘विराट ऑलराउंडर’ प्रदर्शन; इंजिनपासून लिफ्टपर्यंत डल्ला!
अकोला रेल्वे स्टेशनचा असा एकही कोपरा उरला नाही, जिथे चोरांनी हात मारला नाही. स्टेशनच्या दर्शनी भागातील रेल्वे इंजिन परिसर, मुख्य तिकीट घर, प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ६ या सर्वच ठिकाणी चोऱ्या घडल्या आहेत. आता तर रेल्वेत चढताना तसेच काउंटरवरून तिकीट काढताना सुद्धा चोऱ्या झाल्याचे लक्षात आले आहे.

चोर म्हणतात… “मामू लेट जा, तेरी तो वाट लगने वाली है!”
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातला हा डायलॉग सध्या अकोला स्टेशनवर अगदी तंतोतंत जुळतो आहे. गाड्यांना उशीर असल्यामुळे किंवा कनेक्टिंग ट्रेनची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर थकलेले-भागलेले प्रवासी झोपी जातात. प्रवाशांचा डोळा लागला रे लागला की चोर सक्रिय होतात. प्रवाशांची ही हतबलता पाहून चोरही मनातल्या मनात म्हणत असतील, “मामू लेट जा, तेरी तो वाट लगने वाली है!”

प्रत्येकाचे नशीब ‘मद्यपी आयफोन’ प्रवाशासारखे नसते!
प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर मद्यधुंद अवस्थेत झोपलेल्या एका प्रवाशाचा १,३५,०००/- रुपये किमतीचा महागडा मोबाईल चोरीला गेला होता. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत चोराला बेड्या ठोकल्या आणि मोबाईल हस्तगत केला. त्या ‘नशीबवान’ मद्यपी प्रवाशाला त्याचा फोन परत मिळाला आणि पोलिसांचे कौतुकही झाले. आता इतर चोऱ्यांचा तपास पोलीस किती वेगाने करणार? असा प्रवाशांमध्ये एकच सूर उमटत आहे. “त्या मद्यधुंद ‘आयफोन’ प्रवाशासारखी नशिबाची साथ आणि पोलिसांची तत्परता प्रत्येक सामान्याला लाभेल का ?”

सीसीटीव्ही फक्त शोपीस? पुरातन इंजिनसोबत जतन करण्याची मागणी!
स्टेशनवर लाखो रुपये खर्च करून लावलेले सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे जर चोरांना पकडण्यात अपयशी ठरत असतील तर केवळ ‘शोपीस’ चालू ठेवण्यात काय अर्थ? हे कॅमेरे काढून स्टेशनसमोरील दर्शनी भागातील त्या ऐतिहासिक पुरातन रेल्वे इंजिनसोबत एक ‘पुरातन ठेवा’ म्हणून जतन करून ठेवावेत, अशी अत्यंत उपरोधिक आणि संतप्त मागणी आता अकोल्यातील प्रवाशांमधून केली जात आहे.

पोलीस चौकीपासून किती अंतरावर प्रवाशांनी स्वतःला सुरक्षित मानायचे?
अकोला रेल्वे स्टेशनवर चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आश्चर्याची बाब म्हणजे, पोलिसांच्या हद्दीतच प्रवाशांचे खिसे आणि मोबाईल साफ होत आहेत. सुरक्षेचा पुरता बोजवारा उडालेल्या या स्टेशनवर, आता पोलीस चौकीपासून नेमक्या किती अंतरावर प्रवाशांनी स्वतःला सुरक्षित समजायचे? असा जळजळीत प्रश्न आता प्रत्येक प्रवासी विचारत आहे.

स्टेशनवर नक्की साम्राज्य कोणाचे?
अकोला रेल्वे स्टेशनवर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. सुरक्षेसाठी येथे जीआरपी (GRP), आरपीएफ (RPF) सेंट्रल आणि आरपीएफ (RPF) साऊथ सेंट्रल रेल्वे पोलीस अशी तगडी फौज तैनात आहे. तरीही चोरांचा हा ‘विराट’ फॉर्म पाहता एकच प्रश्न उरतो— स्टेशनवर नक्की हुकमत कोणाची चालते? कायद्याची की गुन्हेगारांची? प्रवाशांच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला असून, आता रेल्वे प्रशासनाने या ‘विराट’ चोऱ्यांची सिरीज थांबवावी, एवढीच प्रवाशांची मागणी आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!