अकोला-दर्यापूर मार्गावरील खरब परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात शेतात जाणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. दरम्यान, सिव्हिल लाईन पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या दोन तासांत ट्रक चालक आणि क्लिनरला ताब्यात घेत मोठी कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, खरब येथील रहिवासी विजय इंगळे आणि प्रतिभा इंगळे हे शुक्रवारी पहाटे सुमारे साडेपाच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून शेतात जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला. अपघाताची बातमी गावात पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले.
संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी खरब फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करत आरोपी चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढत आरोपींना लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले.
अवघ्या दोन तासांत पोलिसांची मोठी कारवाई
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सिव्हिल लाईन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. तांत्रिक माहिती आणि शोधमोहीम राबवत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत ट्रक चालक आणि क्लिनरला वाहनासह ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे :
- सूरजसिंग रामेदसिंग (वय 30 वर्षे), रा. बालचिनी, जिल्हा मुरेना, मध्य प्रदेश – ट्रक चालक
- भगवानदास मारासिंग जाठव (वय 50 वर्षे), रा. मुगाबली, जिल्हा मुरेना, मध्य प्रदेश – क्लिनर
तसेच अपघातग्रस्त RJ 11 GB 0492 क्रमांकाचा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे.
परिसरात शोककळा
या दुर्दैवी घटनेमुळे खरब आणि परिसरात शोककळा पसरली आहे. एका क्षणात कुटुंबाचा आधार हरपल्याने इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघातप्रवण ठरत असलेल्या या मार्गावर वेग नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.






Leave a Comment