Ads

अकोल्यात रंगणार अभिनयाची पर्वणी; १३ वर्षांची परंपरा जपत भव्य निशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

By Nilesh Sir

May 24, 2026 3:17 am

Ads

अकोला : नाट्यकलेची आवड असलेल्या तरुण-तरुणींसाठी अकोल्यात पुन्हा एकदा अभिनय, संवादकला आणि रंगभूमीचे धडे घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पत्रकार कॉलनी नवयुवक क्रीडा प्रसारक बहुउद्देशीय संस्था संचालित सिद्धी गणेश प्रोडक्शनतर्फे मागील १३ वर्षांपासून आयोजित करण्यात येणारे निशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिर यंदाही उत्साहात पार पडणार आहे.

येत्या २५ मे ते ३१ मे २०२६ दरम्यान हे विशेष नाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून, १४ वर्षांवरील मुला-मुलींना या शिबिरात सहभागी होता येणार आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी हे शिबिर मोठी संधी मानले जात आहे.

या शिबिरात सिने आणि नाट्यसृष्टीतील अनुभवी कलाकार मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठी वाहिन्यांवरील विविध मालिकांमधून ओळख निर्माण केलेले अभिनेते सागर लांडगे हे मुंबईहून सहभागी होणार आहेत. त्यांनी पुण्यातील ललित कला केंद्रातून नाट्यशिक्षण पूर्ण केले असून अनेक नाट्य प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

तसेच आपल्या अनोख्या प्रशिक्षण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले डॉ. सुनील गजरे, दिल्लीतील एनएसडीमधून नाट्यशिक्षण पूर्ण केलेले दिग्दर्शक व प्रशिक्षक पुष्पक भट, अभिनेत्री अमृता तोडरमल, सुप्रसिद्ध एकपात्रीकार दिलीप देशपांडे आणि दिग्दर्शक-अभिनेते विष्णू निंबाळकर हे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिराचे उद्घाटन २५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे होणार आहे. उद्घाटक म्हणून बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे मानससचिव पवन माहेश्वरी तसेच ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत.

शिबिरासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी सचिन गिरी यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मेसेज करावा किंवा विष्णू क्षीरसागर यांच्याशी 7498885943 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विष्णू क्षीरसागर, अक्षय पिंपळकर, मंदार घेवारे, रोशन समदूरे, प्रमोद वानखडे, नचिकेत वजीरे आणि स्वराज पातोडे हे परिश्रम घेत आहेत. अभिनय, आत्मविश्वास आणि रंगभूमीची ओळख करून देणारे हे शिबिर अकोल्यातील नाट्यप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!