Ads

परतवाडा सारखा अकोल्यातही धोका? कॅफेच्या नावाने कॅफेला कॅबिनचा विळखा!

By Nilesh Sir

April 19, 2026 12:26 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १९ एप्रिल २०२६ :- अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एप्रिल २०२६ मध्ये घडलेला धक्कादायक प्रकार अजूनही समाजमनाला अस्वस्थ करत आहे. अवघ्या १९ वर्षीय तरुणाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. मात्र या घटनेचा धोकादायक परिणाम फक्त परतवाड्यापुरता मर्यादित नाही. आता याच पार्श्वभूमीवर अकोला शहरातील परिस्थितीकडे गंभीरतेने पाहण्याची वेळ आली आहे.

अकोला हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. दरवर्षी हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी बाहेरगावाहून येथे शिक्षणासाठी येतात. पालक मोठ्या विश्वासाने आपल्या मुलांना अकोल्यात पाठवतात. परंतु याच विश्वासाचा गैरफायदा घेत शहरात बऱ्याच ठिकाणी अनधिकृत कॅफे आणि रूम भाड्याने देण्याचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः ट्युशन भागात “₹300 प्रति तास” या दराने कॅफे मध्ये कॅबिन उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे. ही बाब केवळ चिंताजनक नाही, तर संभाव्य गुन्ह्यांना आमंत्रण देणारी ठरू शकते.

परतवाडा प्रकरणाने दाखवून दिले की, अशा जागांचा वापर करून तरुण-तरुणींना जाळ्यात ओढणे, त्यांचे खाजगी क्षण रेकॉर्ड करणे आणि नंतर त्याचा गैरवापर करणे किती सोपे झाले आहे. त्यामुळे अकोल्यातही अशाच प्रकारची घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही. प्रश्न असा आहे की, प्रशासन या गंभीर मुद्द्याकडे किती जागरूक आहे?

या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून माहिती घेतली असता, “अशा प्रकारच्या कोणत्याही कॅफेला अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही,” असे स्पष्ट करण्यात आले. म्हणजेच, शहरात सुरू असलेले असे कॅफे पूर्णपणे बेकायदेशीर असण्याची शक्यता अधिक आहे. मग हे व्यवसाय सुरू कसे? आणि कोणाच्या आश्रयाने? हा प्रश्न अधिक तीव्र होतो.

पोलीस प्रशासनानेही या बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील संशयित ठिकाणांची तपासणी, अचानक छापे, आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे. कारण ही फक्त कायद्याची बाब नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.

यासोबतच, घरमालकांनीही जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना किंवा कोणालाही रूम भाड्याने देताना त्यांची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवणे अत्यावश्यक आहे. ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. तसेच, परिसरातील नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीसांना ११२ नंबर वर कॉल करून कळवणे आवश्यक आहे.

सामाजिक माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे अशा घटनांचा परिणाम अधिक गंभीर होतो. एकदा का कोणाचा खाजगी डेटा व्हायरल झाला, तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. त्यामुळे तरुणीनेही सावध राहणे, अनोळखी व्यक्तींवर अंधविश्वास न ठेवणे आणि स्वतःची गोपनीयता जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आजची गरज आहे ती एकत्रित कारवाईची. प्रशासन, पोलीस, पालक, घरमालक आणि नागरिक सर्वांनी मिळून या समस्येवर उपाय शोधला पाहिजे. अन्यथा, परतवाड्यासारखी घटना अकोल्यात घडण्यास वेळ लागणार नाही.

शेवटी एकच प्रश्न उरतो, वेळीच कारवाई झाली नाही, तर उद्या अकोल्यात अशी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न केवळ प्रशासनालाच नाही, तर संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडणारा आहे.

पोलिस प्रशासन महानगर पालिका कारवाई कधी करणार

शहरातील प्रत्येक कॅफेची माहिती ही त्या त्या हद्दीतील पोलिस स्टेशन मध्ये दिली असते महानगर पालिका म्हणते अशा कोणत्याच कॅबिन कॅफेला परवानगी नाही मग कोणाच्या आशीर्वादाने अकोला शहरात हे कॅबिन कॅफे सुरू आहेत? पोलिस महानगर पालिका या वर कारवाई करणार की कोणती अघटीत घटना घडण्याची वाट पाहणार हा प्रश्न प्रत्येक पालकांच्या मनात नक्कीच उपस्थित होत असेल.

कॅफे चालकांचा नेमका हा अट्टाहास का?

अकोला शहरात असंख्य कॅफे आहेत त्यांचा व्यवसाय देखील उत्तम प्रकारे चालवून ते आपला उदरनिर्वाह देखील करतात मात्र काही व्यावसायिक हे व्यवसाय करायचा म्हणून करतात पण त्यात कॅबिन हा अट्टाहास का हा अनुत्तरीय प्रश्न निर्माण झाला आहे, बार मध्ये परमिट रूम असतात मात्र ते अधिकृत असून त्याची रीतसर परवानगी घेतली जाते मात्र चहाचे दुकान टाकून त्याला कॅफे मध्ये रुपांतरित करून त्याला कॅबिनची जोड देणे हे कितपत योग्य आहे. याचा सर्वाधिक धोका हा ज्या परिसरात शिवणी वर्ग शाळा, महाविद्यालय आहेत तेथे जास्त प्रमाणात दिसून येत आहेत हे कॅफे कपल्स ला बरोबर दिसतात मात्र पोलिस प्रशासन आणि अकोला महानगर पालिकेला याची साधी भनक देखील नसणे म्हणजे ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.

अकोलेकरांनो जागरूक बना अकोला न्यूज नेटवर्क तुमच्या सोबत आहे

आपले अकोला आणि आपण अकोलेकर म्हणून आपली पण काही जबाबदारी आहे आपल्या पाल्यावर आपला विश्वास आहे यात कुठलीच शंका नाही, मात्र आजकालच्या या डिजिटल चंदेरी दुनियेत हरवायला वेळ लागत नाही आणि टुकार भामट्यांना सावध हेरण्यास संधी मिळते त्या नंतर मात्र अब्रूचे लक्तर वेशीवर टांगले जातात मात्र आता अकोला न्यूज नेटवर्क तुमच्या सोबत ठाम पणे उभे आहे तुम्हाला देखील अशा कॅफेंची माहिती असेल तर आम्हाला 7720990022 या व्हॉट्सअँप नंबर वर नक्की कळवा आम्ही तुमचे नाव गुपित ठेवू आणि अशा बेकायदेशीर कॅफेनवर कारवाई व्हावी याची संपूर्ण उपाययोजना करून हे कॅफे कायमचे बंद करू.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment