अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्रीचा प्रकार दिवसेंदिवस बळावत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. बंदी असलेला गुटखा खुलेआम विक्रीसाठी उपलब्ध होत असून, या बेकायदेशीर धंद्यामागे ‘दिन्या-श्याम’ जोडी नंतर आता ‘नदीम-रफिक’ जोडी सक्रिय झाल्याची चर्चा जोर धरत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही जोडी पोलिसांच्या डोळ्यासमोरच मोठ्या प्रमाणात गुटखा पुरवठा करत आहे. एवढेच नव्हे, तर नदीम हा थेट ठाणेदारांच्या भाड्याच्या घराच्या शेजारी राहत असल्याची माहिती समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे.
गंभीर बाब म्हणजे, एवढ्या उघडपणे चालणाऱ्या अवैध धंद्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे “चोर पोलिसांवर भारी” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेलाच जर गुन्हेगारांनी आव्हान दिले, तर सामान्य नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
एकीकडे पोलीस अधीक्षकांकडून ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध गुटख्याविरोधात कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे, मात्र प्रत्यक्षात दहीहंडा परिसरात परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसून येते. वरवर कारवाईचे चित्र आणि प्रत्यक्षात खुलेआम सुरू असलेला धंदा, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमध्ये सहजपणे गुटखा उपलब्ध होत असल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढत आहे. शासनाने गुटख्यावर बंदी घालूनही जमिनीवर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. जर अवैध धंदे इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असतील आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयश येत असेल, तर यामागे निष्क्रियता की संगनमत, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
नागरिकांकडून आता कठोर कारवाईची मागणी होत असून, या गुटखा माफियांवर लगाम लावण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दहीहंड्यातील अवैध गुटखा विक्री हा केवळ कायद्याचा भंग नाही, तर समाजासाठीही धोकादायक ठरत आहे. आता तरी पोलीस प्रशासन जागे होऊन ‘नदीम-रफिक’सारख्या घटकांवर कारवाई करणार का, की हा धंदा असाच सुरू राहणार? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment