अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी :- अकोला रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांनी मोठी धाडसी कारवाई करत ९.४१० किलो गांजा जप्त केला असून, दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अकोल्यात अंमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार सतीष जवंजाळ यांना गुप्त माहिती मिळाली होती. ट्रेन क्रमांक २०८४३ पुरी-अजमेर एक्सप्रेस अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येताच दोन संशयित इसमांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.
पोलीसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर त्यांची नावे फारूक खान हफिजउल्ला खान (वय ४३, खदान, अकोला) आणि शेख अजीज शेख महेबुब (वय ४५, सोनटक्के प्लॉट, अकोला) अशी असल्याचे समोर आले.
त्यांच्या जवळील दोन प्रवासी बॅगची तपासणी केली असता, खाकी रंगाच्या सेलोटेपने बांधलेले संशयास्पद बंडल आढळले. तपासणीत त्यामध्ये ९.४१० किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत ६७,५०० रुपये इतकी आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी हा गांजा परराज्यातून आणल्याची कबुली दिली आहे. दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कलम २० (बी) (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या यशस्वी कारवाईमुळे अकोला रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या अंमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात बसल्याचे मानले जात आहे.







Leave a Comment