अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वितरणात गंभीर अनियमितता समोर येत असून, होम डिलिव्हरीच्या नावाखाली ग्राहकांची सर्रास लूट सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
नियमांनुसार गॅस सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक असताना, अनेक ठिकाणी ग्राहकांना घरी डिलिव्हरी न देता वेगळ्या ठिकाणी बोलावून सिलेंडर देण्याचा प्रकार सुरू आहे. इतकेच नाही, तर या वेळी ग्राहकांकडून अतिरिक्त ५० ते १०० रुपयांची उघड मागणी केली जात असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलावर एक दर नमूद असतो, मात्र प्रत्यक्षात डिलिव्हरीच्या वेळी वेगळाच दर आकारला जातो. त्यामुळे “नियम काय आणि चालतंय काय?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सांगितले की, “जादा पैसे दिले नाहीत तर सिलेंडर उशिरा मिळतो किंवा थेट नाकारला जातो.” यामुळे सामान्य कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या प्रकारामुळे गॅस वितरण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, काळाबाजार सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित गॅस एजन्सी आणि पुरवठा विभागाला याची माहिती असूनही कारवाई का होत नाही, हा मोठा प्रश्न आहे.
ग्राहकांची लूट सुरू असताना प्रशासन मात्र मौन का? असा रोखठोक सवाल उपस्थित होत आहे. जर नियमांचे उघड उल्लंघन होत असेल, तर संबंधितांवर कडक कारवाई का होत नाही, याबाबतही संताप व्यक्त केला जात आहे.
आता प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा ग्रामीण भागातील नागरिकांची ही लूट अशीच सुरू राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.







Leave a Comment