बुलढाणा कोषागारात ACB चा सापळा; पेन्शन फाईलसाठी २० हजारांची लाच मागणारे तीन जण रंगेहात अटकेत

बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत पेन्शन फाईल मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे बुलढाणा कोषागार कार्यालय, ACB कारवाई, आणि पेन्शन लाच प्रकरण यामुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे वडील पोलीस दलातून २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. मे २०२५ मध्ये त्यांच्या निधनानंतर पेन्शन व थकीत रक्कम मंजूर करण्यासाठी तक्रारदाराने ऑक्टोबर २०२५ मध्ये जिल्हा कोषागार कार्यालयात अर्ज केला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून वारंवार कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून फाईल प्रलंबित ठेवण्यात येत होती.

अखेर २६ फेब्रुवारी रोजी फाईल मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने तात्काळ ACB कडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे १५ हजार रुपये स्वीकारताना तिघांनाही रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये:

  1. प्रविण मोंढे (अप्पर कोषागार अधिकारी)
  2. विनोद घट्टे (लिपिक)
  3. जीवन काळे (लिपिक)

यांचा समावेश आहे.

या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई ACB चे DYSP भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक विलास गुशिंगे व त्यांच्या पथकाने केली.

दरम्यान, या बुलढाणा ACB कारवाईमुळे सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पेन्शनसारख्या हक्काच्या लाभासाठी लाच मागितल्याच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment