बीड जिल्हा पोलीस दलातील 174 पोलीस शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या मैदानी चाचणी प्रक्रियेदरम्यान पहिल्याच दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर एका 26 वर्षीय उमेदवाराचा अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाला. या घटनेमुळे भरती प्रक्रियेत शोककळा पसरली आहे.
मृत उमेदवाराचे नाव दिपक भास्कर वाव्हळे (वय 26, रा. मांडखेल, ता. परळी वै., जि. बीड) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिपक यांनी 1600 मीटर धावण्याची मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली होती.
CCTV फुटेजनुसार, दुपारी 12.55 वाजता त्यांनी धाव पूर्ण केल्यानंतर काही वेळ विश्रांती घेतली आणि त्यानंतर फिनिशिंग पॉईंटजवळील मेडिकल रूमकडे चालत गेले. वैद्यकीय कॅम्पमध्ये उपस्थित डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून प्राथमिक उपचार सुरू केले. त्यांना आयव्ही (IV) देण्यात आले. मात्र तपासणीदरम्यान त्यांची नाडी कमी लागत असल्याचे आढळले.
दुपारी 1.10 वाजता रुग्णवाहिका मेडिकल कॅम्पमध्ये दाखल झाली. त्यानंतर 1.14 वाजता दिपक वाव्हळे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
पोलीस प्रशासनाने घटनेची नोंद घेतली असून सर्व प्रक्रिया CCTV चित्रीकरणाखाली असल्याची माहिती दिली आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेदरम्यान स्वतःच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी केले आहे.









