अकोट तालुक्यातील कुंभारवाडी परिसरात घडलेल्या तब्बल सात लाख रुपयांच्या घरफोडी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, अकोट पोलिसांनी वेगवान आणि अचूक तपास करत दोघा सख्ख्या भावांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीतील एकूण ३ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन्ही आरोपी सध्या अकोला जिल्हा कारागृहात आहेत.
ही घटना ३ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली होती. फिर्यादी सुलोचना गंगाराम धर्मे (वय ६८), रा. कुंभारवाडी, मोठे बारगण, अकोट यांनी २८ ऑक्टोबर रोजी अकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पान विक्री व्यवसायातून आणि शेत लागवडीसाठी जमवलेले सात लाख रुपये घरातील लाकडी आलमारीत ठेवले होते. दरम्यान, त्या अंजनगाव सुर्जी येथे बहिणीकडे गेलेल्या असताना अज्ञात आरोपींनी घरफोडी करून ही रक्कम चोरून नेली होती.
तक्रारीवरून भा.न्या.संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. डि.बी. पथकाने संशयावरून प्रविण रमेश उंदरे (वय ३०) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या भाऊ करण उर्फ कृष्णा उंदरे याच्यासह घरफोडी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान सोन्याचे कानातले, दोन मोटारसायकली, टिनपत्रे, लोखंडी अँगल असा २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यानंतर फरार करण उंदरे यालाही अटक करून त्याच्याकडून मोबाईल, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा आणखी ८०,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, अकोट पोलिसांनी घरफोडी प्रकरणात ठोस कारवाई करत गुन्हेगारीवर चांगलाच अंकुश ठेवला आहे.









