शेतकऱ्यांच्या गोठ्यातील नेहमीची शांतता एका क्षणात थरारात बदलली… हालचालींचा संशय घेतला, दार उघडलं आणि समोर जंगलाचं अस्तित्व उभं राहिलं—बिबट्याचं शावक! कळमेश्वर शिवारात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण मेहकर तालुका हादरून गेला.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कळमेश्वर शिवारात बिबट्याचे शावक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या गोठ्यात अचानक हालचाली जाणवल्यानंतर पाहणी केली असता बिबट्याचे शावक आढळून आले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमेश्वर शिवारातील एका गोठ्यात शेतकऱ्यांना सकाळच्या सुमारास संशयास्पद हालचाली जाणवल्या. गोठ्यात पाहणी केली असता तेथे बिबट्याचे शावक दिसून आले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच शावक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने बिबट्याच्या शावकाला ताब्यात घेऊन त्याची आरोग्य तपासणी केली असता शावक सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शावकाच्या आईचा शोध घेण्यासाठी सर्च मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र सध्या तरी बिबट मादीचा शोध लागलेला नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी आणि रात्रीच्या वेळी एकटे शेतात जाणे टाळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
बिबट्याच्या शावकामुळे मानवी वस्ती आणि वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, वनविभागाची पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









