चार बटणं दाबली नाहीत तर मत बाद? महानगरपालिका निवडणुकीत मतदार गोंधळात

मतदान केंद्रात एक नव्हे… दोन नव्हे… तर चार वेळा बटण दाबावं लागणार आहे! आगामी महानगरपालिका निवडणुकीत लागू होणाऱ्या बहुसदस्यीय पद्धतीमुळे मतदारांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्णपणे बदलत आहे. एका छोट्याशा चुकिमुळे संपूर्ण मत बाद होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक मतदारासाठी ही निवडणूक जागरूकतेची कसोटी ठरणार आहे. वाचा सविस्तर आढावा…

आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदारांसाठी मतदानाची नवी आणि महत्त्वाची पद्धत लागू होणार आहे. मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील इतर २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय (Multi-Member Ward) पद्धत लागू करण्यात येणार असून, त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार वेळा मतदान करणे बंधनकारक असणार आहे.

या नव्या पद्धतीनुसार एका प्रभागात अ, ब, क, ड अशा चार वेगवेगळ्या मतदान यंत्रांवर मतदान करावे लागणार आहे. म्हणजेच, एका प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार असून चारही मतांचा वापर करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, चारपैकी एकही मत दिले नाही तर संपूर्ण मतदान बाद होणार असल्याने मतदारांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.

मतदारांना प्रत्येक मशीनवर वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. मात्र, मतदान करताना एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवावी लागणार आहे. ईव्हीएम मशीनवर बिप (Beep) आवाज येईपर्यंत मतदान पूर्ण झाले असे मानले जाणार नाही. बिप आवाज न आल्यास मतदान ग्राह्य धरले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाकडून या नव्या प्रणालीबाबत जनजागृती केली जाणार असली, तरी मतदानाच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी मतदारांनी आधीच माहिती घेणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. एका चुकीमुळे संपूर्ण मत बाद होण्याचा धोका असल्याने, ही निवडणूक पद्धत मतदारांसाठी कसोटीची ठरणार आहे.

एकूणच, आगामी महानगरपालिका निवडणूक केवळ राजकीयच नव्हे तर मतदान प्रक्रियेच्या दृष्टीनेही ऐतिहासिक आणि आव्हानात्मक ठरणार असून, जागरूक मतदारच लोकशाही बळकट करणार हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

https://www.instagram.com/reel/DS7JAQrkZvb/?igsh=MXF4N24zejJqb3ZhbA==

Leave a Comment