Ads

कावड यात्रेआधी खड्ड्यांना धुळीचा ‘मुलामा’! अकोट-अकोला महामार्गावर रस्ता दुरुस्तीचा अनोखा प्रताप

By Nilesh Sir

September 7, 2026 7:22 am

Ads

डांबर नाही… मुरूम नाही… गिट्टीही नाही! मग खड्डे बुजवायचे कसे? याचं भन्नाट उत्तर अकोट-अकोला महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर पाहायला मिळालं. चक्क रस्त्यावर साचलेली धूळ जमा करून खड्ड्यांमध्ये टाकत ते बुजविण्याचा प्रताप करण्यात आला. विशेष म्हणजे, आज श्रावणातील चौथ्या सोमवारनिमित्त अकोट शहरात भव्य कावड यात्रा निघणार आहे.

कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर अकोट-अकोला महामार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिक आणि भाविकांची वर्दळ राहणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, रेल्वे उड्डाण पुलावरील खड्ड्यांवर करण्यात आलेली ही ‘धुळीची मलमपट्टी’ चर्चेचा विषय ठरली आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी योग्य साहित्याचा वापर करण्याऐवजी चक्क रस्त्यावरची धूळच गोळा करून खड्ड्यांमध्ये टाकण्यात आली. त्यामुळे खड्डे बुजले की केवळ काही काळासाठी त्यावर पडदा टाकण्यात आला, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

कावड यात्रा ही अकोट शहरातील मोठी धार्मिक मिरवणूक आहे. यात्रेच्या दिवशी या मार्गावर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने रस्त्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करून प्रशासन नेमका कोणता संदेश देत आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

खड्ड्यांचा प्रश्न जुना… उपाय मात्र नवा! रस्त्यावरील धूळ खड्ड्यात टाकून दुरुस्ती केल्याने हा प्रकार सोशल मीडियावर आणि नागरिकांमध्येही चर्चेचा विषय होण्याची शक्यता आहे.

कावड यात्रेच्या निमित्ताने शहर सजत असताना, प्रमुख महामार्गाची अशी अवस्था समोर येणे हे निश्चितच लक्षवेधी ठरत आहे. यात्रेपुरती दिखाऊ दुरुस्ती करण्याऐवजी या मार्गावरील खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची गरज आहे.

कावड यात्रेचा जल्लोष होणार… पण रस्त्यावर खड्डे आणि खड्ड्यांमध्ये धूळ!
अकोट-अकोला महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावरचा हा ‘धुळीचा उपचार’ आता प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्न उपस्थित करत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!