अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १३ ऑगस्ट गुरुवार :- अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन अनुर्गत येणाऱ्या अंजनगाव मार्गावर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता एवढी होती की, दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. मात्र, अपघातानंतर समोर आलेल्या कथित गुटखा वाहतुकीच्या चर्चेमुळे या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे.
अपघातग्रस्त वाहनांपैकी एका व्हॅगनारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. विशेष म्हणजे, भरदिवसा कथित गुटखा वाहतूक होत असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, अपघातानंतर काही मिनिटांतच व्हॅगनारमधील कथित गुटखा गायब झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे वाहनात खरोखरच प्रतिबंधित गुटखा होता का? असल्यास तो कुठून आणला जात होता आणि कुठे नेला जात होता? अपघातानंतर तो नेमका कुठे गेला? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, वाहनात गुटखा होता आणि तो अपघातानंतर गायब झाला, या बाबींची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या चर्चेची सत्यता तपासणे महत्त्वाचे आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस आणि संबंधित प्रशासनाने अपघाताचा तपास करताना कथित अवैध गुटखा वाहतुकीच्या दिशेनेही चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. वाहनाची तपासणी, उपलब्ध पुरावे आणि पंचनामा यामधून या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अपघाताचा तपास करताना कथित गुटखा वाहतुकीचे गूढही उलगडणार का? याकडे आता अकोट-अंजनगाव मार्गावरील नागरिकांचे लक्ष लागले आहे.






Leave a Comment