Ads

क्रांतीदिनी गुरुकुंज आश्रमातून ‘क्रांतीज्योत’ प्रज्वलित; विदर्भभर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा संदेश पोहोचणार

By Nilesh Sir

August 11, 2026 7:34 am

Ads

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी योगदान, राष्ट्रकार्य आणि समाजजागृतीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमाच्या केंद्रीय प्रचार विभागातर्फे क्रांतीज्योत यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

क्रांतीदिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या महासमाधीस्थळी आरती व पूजन करून क्रांतीज्योत यात्रेला विधिवत सुरुवात झाली. त्यानंतर ही यात्रा राष्ट्रसंतांच्या जन्मभूमीकडे रवाना झाली.

राष्ट्रसंतांची जन्मभूमी असलेल्या यावली शहीद येथे जन्मस्थान स्मृती मंदिर समिती, शहीद स्मारक समिती आणि श्रीगुरुदेव सेवाश्रम परिसरात क्रांतीज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रसंतांच्या क्रांतीकार्याचे स्मरण करत शहीदांना भावपूर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली.

ही क्रांतीज्योत यात्रा ९ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विदर्भातील विविध जिल्हे आणि गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा राष्ट्रभक्ती, ग्रामविकास, सामाजिक समता, स्वावलंबन आणि मानवतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

🌱 ‘शाखा तेथे वृक्षारोपण’चा संदेशही

क्रांतीज्योत यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचा ‘शाखा तेथे वृक्षारोपण’ हा उपक्रम. यात्रा ज्या-ज्या गावातून आणि ठिकाणाहून जाणार आहे, त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक गतिमान केली जाणार आहे.

यावली शहीद येथेही वृक्षारोपण करून शहीदांना मानवंदना देण्यात आली. त्यामुळे क्रांतीज्योतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही गावागावांत पोहोचणार आहे.

यावेळी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी श्री. प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी श्री. बाबाराव पाटील, प्रचार प्रमुख श्री. गोपाल कडू, सरचिटणीस श्री. जनार्दन बोथे, कार्यकारिणी सदस्य श्री. दामोदर पाटील, आध्यात्म विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांच्यासह अमरावती व नागपूर विभागातील सेवाधिकारी, कार्यकर्ते आणि गुरुदेवप्रेमी उपस्थित होते.

यावली शहीद येथे जन्मस्थान स्मृती समितीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र कांडलकर, सचिव श्री. सुनील देशमुख यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावली शहीद येथून क्रांतीज्योत यात्रा देवरी, देवरा, पूर्णानगर मार्गे चांदई व साखरी (ता. अंजनगाव सुर्जी) येथे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

Related Article

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!