पाय धुण्यासाठी पाण्याने तुडुंब भरलेल्या खदानीत उतरलेल्या दोन मावस भावंडांचा बुडून दुर्दैवी अपघात झाल्याची हृदयद्रावक घटना देऊळगाव माळीजवळील कोराडी प्रकल्प परिसरात घडली. या घटनेत अयान राजू शेख (वय २०, रा. देऊळगाव माळी) याचा मृतदेह रात्री उशिरा शोधमोहीम राबवून पाण्याबाहेर काढण्यात आला. तर त्याचा मावस भाऊ आवेद इब्राहिम शेख (वय १९, रा. लोणार) याचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव माळीजवळील कोराडी प्रकल्प परिसरातील पाण्याने भरलेल्या खदानीत दोन्ही मावस भावंडे पाय धुण्यासाठी उतरली होती. मात्र, पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण, ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारातही शोधमोहीम थांबविण्यात आली नाही. उपलब्ध साधनांच्या मदतीने पाण्यात शोध घेण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर अयान राजू शेख याचा मृतदेह शोधण्यात यश आले आणि तो पाण्याबाहेर काढण्यात आला.
मात्र, आवेद इब्राहिम शेख याचा शोध अद्याप सुरू असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. रात्रीच्या काळोखातही स्थानिक तरुण आणि ग्रामस्थांनी प्रशासन व पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू ठेवले. आवेद सुखरूप सापडावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. काही क्षणांपूर्वी सोबत असलेली दोन तरुण भावंडे आणि त्यानंतर घडलेला हा दुर्दैवी प्रसंग कुटुंबीयांसाठी अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारा ठरला आहे. एकीकडे अयानचा मृतदेह हाती लागल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर दुसरीकडे आवेदच्या शोधाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देऊळगाव माळी–कोराडी प्रकल्प परिसरातील या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, आवेद इब्राहिम शेख याचा शोध लागण्याची प्रतीक्षा कुटुंबीयांसह ग्रामस्थांना लागली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधमोहीमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






Leave a Comment