१ ऑगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू झाल्यानंतर पोलिस प्रशासन आणि वाहतूक शाखा रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. नियमांचे पालन व्हावे, अपघात कमी व्हावेत हा उद्देश निश्चितच महत्त्वाचा आहे. मात्र दुसरीकडे अकोट तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे मात्र पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांचा थेट प्रश्न आहे, हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांवर ज्या वेगाने आणि सातत्याने कारवाई होते, त्याच कठोरतेने वरली मटका, गुटखा आणि अवैध दारू व्यवसायावर कारवाई का होत नाही? कायद्याचा धाक फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
अकोट शहरासह ग्रामीण भागात वरली मटका, गुटखा विक्री आणि अवैध दारूचा पुरवठा सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १७ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईने मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा परिसरात पोहोचत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा शहरात येत असताना संबंधित यंत्रणेला याची माहिती नव्हती का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, दारूबंदी विभागाचा कारभार अकोल्यावरून चालत असल्याने त्याचा फायदा अवैध दारू तस्कर घेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मोटारसायकलींवरून गावोगावी दारूच्या पेट्या पोहोचवल्या जात असल्याच्या चर्चा सुरू असून यावर सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाईची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे, एक-दोन मोठ्या कारवायांचा गाजावाजा करण्यापेक्षा अवैध धंद्यांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि कठोर मोहीम राबवावी. हेल्मेट कारवाईसोबतच अवैध धंद्यांवरही तितक्याच कठोरतेने धडक कारवाई झाली, तरच कायद्यावरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल.







Leave a Comment