Ads

मध्यरात्री बसस्टॉपवर एकटी महिला अधिकारी… पुढील 3 तासांत जे घडलं ते धक्कादायक

By Nilesh Sir

May 8, 2026 7:27 am

Ads

महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासन कितीही दावे करत असलं, तरी प्रत्यक्ष परिस्थिती किती धक्कादायक आहे, याचा प्रत्यय हैदराबादमध्ये आलेल्या एका धाडसी प्रयोगातून पुन्हा एकदा समोर आला आहे. कोणतेही पोलिस संरक्षण नाही… साधा वेष… मध्यरात्रीचा सुनसान बसस्टॉप… आणि एक महिला एकटी उभी… पुढील काही तासांत जे घडलं, त्याने महिलांच्या सुरक्षेवरील गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणले आहेत.

हैदराबादमधील मलकाजगिरीच्या महिला पोलिस आयुक्त बी. सुमती यांनी महिलांच्या सुरक्षेची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी एक अनोखी आणि धाडसी गुप्त मोहीम राबवली. १ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कोणतीही सुरक्षा न घेता मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० या वेळेत सामान्य महिलेसारख्या वेशात बसस्टॉपवर एकटं उभं राहून परिस्थितीचा अभ्यास केला.

या तीन तासांच्या कालावधीत तब्बल ४० पुरुष त्यांच्या आसपास जमा झाल्याचं समोर आलं. काही जण मद्यधुंद अवस्थेत होते, तर काहींनी गांजाचे सेवन केल्याचेही निदर्शनास आले. विशेष म्हणजे, आपण एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याशी संवाद साधत आहोत, याची त्या व्यक्तींना कल्पनाही नव्हती.

या घटनेमुळे रात्रीच्या वेळी महिलांना सार्वजनिक ठिकाणी कोणत्या असुरक्षित वातावरणाचा सामना करावा लागतो, याचं भयावह वास्तव पुन्हा समोर आलं आहे. महिलांना मिळणारी वागणूक, सार्वजनिक ठिकाणांवरील गैरप्रकार आणि सुरक्षेची कमतरता या सर्व बाबींवर या मोहिमेमुळे गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी संबंधित सर्व व्यक्तींची ओळख पटवली. मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी समुपदेशनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. महिलांचा सन्मान राखणे, सार्वजनिक ठिकाणी योग्य वर्तन ठेवणे आणि मानसिकता बदलणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, बी. सुमती या यापूर्वीही अशा गुप्त मोहिमा राबवत आल्या आहेत. सुमारे २५ वर्षांपूर्वी डीएसपी पदावर असताना त्यांनी काझीपेट रेल्वे स्टेशन परिसरात महिलांच्या सुरक्षेची पडताळणी करण्यासाठी अशीच मोहीम हाती घेतली होती.

तेलंगणा केडरच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. सुमती या कठोर, संवेदनशील आणि नाविन्यपूर्ण पोलिसिंगसाठी ओळखल्या जातात. माओवादी आत्मसमर्पण मोहिमा असोत किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पोलिस सुधारणा, त्यांनी अनेक महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये प्रभावी भूमिका बजावली आहे.

दरम्यान, त्यांच्या या धाडसी प्रयोगामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, सोशल मीडियावरही त्यांच्या कार्याचे जोरदार कौतुक होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!