ANN अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अनुराग अभंग जिल्हा प्रतिनिधी :- या वर्षीचा ipl क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आणि याच ipl वर सट्टा लावणारे सक्रिय झाले पण जग जसे डिजिटल होत आहे त्याचीच कास धरून हे साटोडे देखील डिजिटल होत आहेत मात्र या सट्टा बाजांनी लावलेली फोल्डिंग रामदास पेठ पोलिसांनी भेदत कारवाईचा षटकार मारला आहे.
क्रिकेट प्रेमीसाठी पर्वणी समजल्या जाणाऱ्या आयपीएल सामन्यांना तत्पूर्वीच सुरुवात झाली असून अकोला जिल्ह्यात सलामीच्या सामन्यापासूनच लाखो रुपयांची सट्टेबाजी सुरु असल्याचे बोलल्या जातेय. कायद्याने क्रिकेटवर सट्टा लावणे गुन्हा असला तरी या सामन्यादरम्यान मोबाईल द्वारे सट्टा खेळणाऱ्या दोन सट्टेबाजांवर रामदास पेठ पोलिसांनी कारवाईचा षटकार खेचत IPL क्रिकेट सटटा जुगार खेळणारे दोन आरोपीतांना अटक करून त्यांचे ताब्यातुन ३४, २००/- रू चा मुददेमाल जप्त केला आहे.
अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे देशमुख फेल परिसरातील एफसीआय गोडाऊनलगत छापा टाकून IPL क्रिकेट सट्ट्यावर कारवाई केली. या कारवाईदरम्यान आरोपी शुभम कैलास थोरात (वय 30, रा. बाबा रायटर चाळ, देशमुख फेल, अकोला) आणि शिवमोहन उर्फ भोला हरीमोहन यादव (वय 36, रा. वरवट बकाळ, जि. बुलढाणा, सध्या रा. देशमुख फेल, अकोला) हे मोबाईलवर CSK विरुद्ध DD सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळताना आढळले.
पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल फोन व 1200 रुपयांची रोकड असा एकूण 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत आरोपींनी मोहित शर्मा व हर्षल चाळसे (अकोला) यांची नावे सांगितली असून ते फरार आहेत. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. पी. रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात प्रदीप जोगदंड, निलेश गायकवाड, दादाराव टापरे, श्याम मोहळे, अनिल लाहोळे, अभिजित इंगळे, प्रेम नांदोकार आदी पथकाने पार पाडली.







Leave a Comment