Ads

लोहारा ग्रामपंचायतीत ३४ लाखांचा अपहार उघड! तात्कालीन सरपंच व सचिवाविरोधात गुन्हा दाखल; तालुक्यात खळबळ

By Nilesh Sir

March 13, 2026 4:46 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात लोहारा ग्रामपंचायतीतील तब्बल ३४ लाख रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तात्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक (सचिव) यांच्याविरोधात उरळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२३ मध्ये ग्रामपंचायतीच्या विविध विकास योजनांच्या निधीचा गैरवापर करून अपहार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला होता. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बाळापूर पंचायत समितीकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सखोल चौकशी केली असता निधी अपहाराबाबत संशयास्पद नोंदी आढळून आल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची माहिती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा चौकशी समितीचे तपास अधिकारी गंगाधर गुंडेवार यांनी दिली.

त्यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी १२ मार्च रोजी उरळ पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ठाणेदार एपीआय पंकज कांबळे यांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

या प्रकरणामुळे लोहारा ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!