“टीम इंडियाच्या विजयासाठी अकोल्यात भक्तीचा जल्लोष!”टी-२० विश्वचषक फायनलपूर्वी महाकालेश्वर मंदिरात अभिषेक; क्रिकेट-भक्तीचा अनोखा संगम

अकोला न्यूज नेटवर्क | अनुराग अभंग, जिल्हा प्रतिनिधी
अहमदाबाद येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास १४० कोटी भारतीयांचे लक्ष या ऐतिहासिक सामन्याकडे लागले असताना अकोला शहरात क्रिकेटप्रेमींनी भक्ती आणि क्रिकेटचा अनोखा संगम घडवून आणला.


रविवारी सकाळी शहरातील श्री महाकालेश्वर शिवलिंग मंदिरात क्रिकेटप्रेमी मुले आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र अर्पण करत विशेष अभिषेक व आरती केली आणि भारतीय संघाच्या विजयासाठी भगवान भोलेनाथाकडे मनोभावे प्रार्थना केली.
मंदिर परिसरात यावेळी देशभक्तीचा उत्साहही ओसंडून वाहताना दिसला. उपस्थितांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम” आणि “भोलेनाथ की जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत भारतीय संघाचे मनोबल वाढवले. भारतीय खेळाडूंना सामन्यात जिंकण्यासाठी ताकद, आत्मविश्वास आणि जिद्द मिळावी, अशी प्रार्थना करण्यात आली.


अभिषेकानंतर क्रिकेटप्रेमींशी संवाद साधताना प्रतिनिधी धनंजय साबळे यांना त्यांनी सांगितले की, भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून कोट्यवधी लोकांच्या भावना आणि जिद्दीशी जोडलेला आहे. भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उतरतो तेव्हा प्रत्येक भारतीयाचे हृदय त्या संघासोबत धडधडत असते. त्याच भावनेतून टीम इंडियाच्या विजयासाठी भगवान भोलेनाथाकडे प्रार्थना करण्यात आली.


यावेळी उपस्थितांनी भारतीय संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याच्यासह संपूर्ण भारतीय संघाला शुभेच्छा देत आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.अकोल्यात पाहायला मिळालेला हा भक्ती आणि क्रिकेटचा अनोखा संगम भारतात खेळ हा केवळ मैदानापुरता मर्यादित नसून तो लोकांच्या भावना, श्रद्धा आणि देशभक्तीशी घट्ट जोडलेला आहे, याचे प्रतीक ठरला.

Leave a Comment