अजबच! रंगाने नव्हे, ‘या’ गावात खेळतात दगडांची होळी

होळी म्हटली की रंग, गुलाल आणि आनंदाचा उत्सव डोळ्यासमोर येतो. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गदाजी बोरी या गावात वेगळीच परंपरा पाहायला मिळते. येथे रंगांची नाही तर चक्क दगडांची होळी खेळली जाते. धुलिवंदनाच्या दिवशी गावकरी एकमेकांवर दगडफेक करत ही परंपरा साजरी करतात.

गदाजी बोरी गाव मुख्य मार्गापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. फाल्गुन पौर्णिमेला येथे तीन दिवसांची यात्रा भरते. सुमारे ६० वर्षांपूर्वी येथे वास्तव्यास असलेल्या श्री संत गदाजी महाराजांप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. करोनाकाळ वगळता गावकरी ही परंपरा सातत्याने पाळत आहेत.

परंपरेनुसार धुलिवंदनाच्या दिवशी गावकरी मडक्यात धुनी पेटवून अंत्ययात्रेसारखी मिरवणूक काढतात. त्यानंतर भाविक आंघोळ करून मंदिराजवळील उंच टेकडीवर जातात. टेकडीवरून काही जण दगडफेक सुरू करतात आणि कुणी जखमी होईपर्यंत हा क्रम चालू राहतो. जखमी व्यक्तीला मंदिरात नेऊन विभूती लावली जाते. काही वेळाने ती व्यक्ती शुद्धीवर येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

दरवर्षी दूरवरून भाविक ही यात्रा अनुभवण्यासाठी येथे गर्दी करतात. मात्र या परंपरेबाबत सुरक्षिततेचा मुद्दाही चर्चेत असतो.

Leave a Comment