Budget 2026 मध्ये ऑरेंज इकॉनॉमीला मोठा बूस्ट!

केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प 2026 सादर करताना ऑरेंज इकॉनॉमी अर्थात क्रिएटिव्ह इकॉनॉमीला प्राधान्य देण्याची मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे युवक, स्टार्टअप्स, डिजिटल क्रिएटर्स, कलाकार आणि नवउद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत.

अर्थसंकल्पात गेमिंग, डिजिटल कंटेंट, कला, डिझाइन, फॅशन, चित्रपट आणि संगीत क्षेत्राच्या विकासासाठी विशेष उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकारने 2030 पर्यंत सुमारे 20 लाख कुशल व्यावसायिक घडवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी देशभरातील 15,000 माध्यमिक शाळांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब’ स्थापन केल्या जाणार आहेत. या लॅबमधून विद्यार्थ्यांना व्हिडिओ निर्मिती, अ‍ॅनिमेशन, गेम डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझाइन आणि डिजिटल स्टोरीटेलिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

याशिवाय जामनगर येथे आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून, देशभरात तीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचा प्रस्तावही अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे.

कृषी क्षेत्रासाठी ‘भारत व्हिस्टा’ नावाचे एआय टूल विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना पीक नियोजन, हवामान माहिती आणि बाजारभावाबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. या सर्व घोषणांमुळे क्रिएटिव्ह इकॉनॉमीला नवे बळ मिळून रोजगारनिर्मिती, स्टार्टअप वाढ आणि डिजिटल भारताच्या संकल्पनेला गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment