कॅलेंडरचं पान उलटताच केवळ तारीखच नाही तर सामान्य नागरिकाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेली अनेक आर्थिक गणितेही बदलली आहेत. 1 फेब्रुवारीपासून लागू झालेल्या नव्या नियमांमुळे प्रवास, स्वयंपाकघर, धूम्रपान आणि गुंतवणूक अशा प्रत्येक क्षेत्रावर थेट परिणाम होणार आहे. फास्टॅगपासून ते अर्थसंकल्पामुळे सुरू असलेल्या शेअर बाजारापर्यंत आजचा दिवस सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा ठरतोय.
1) फास्टॅग नियमात मोठा बदल – वाहनधारकांना दिलासा
महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवीन फास्टॅगसाठी ‘नो युवर व्हेईकल’ (KYV) प्रक्रिया बंद केली आहे. आता कार, जीप आणि व्हॅनसाठी नवीन फास्टॅग घेताना पोस्ट-इश्यूअन्स केवायसीची कटकट राहणार नाही. जुन्या फास्टॅग वापरकर्त्यांसाठीही नियमित केवायसी बंधनकारक नसेल.
2) सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ महाग
1 फेब्रुवारीपासून सिगारेट, जर्दा, गुटखा आणि पान मसाल्याच्या किमती वाढल्या आहेत. सरकारने ड्युटी दरात सुधारणा केल्यामुळे विशेषतः फिल्टर आणि लांब सिगारेटच्या दरात मोठी वाढ दिसून येणार आहे. यामुळे धूम्रपान करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.
3) गॅस सिलिंडरच्या किमतीत बदलाची शक्यता
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरांनुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सुधारणा होऊ शकते. व्यावसायिक सिलिंडर महाग झाल्यास हॉटेलमधील जेवणही महागण्याची शक्यता आहे.
4) CNG, PNG आणि विमान इंधन दरात बदल
सीएनजी, पीएनजी आणि विमान इंधनाच्या (ATF) दरातही आज सुधारणा अपेक्षित आहे. याचा परिणाम वाहतूक खर्च आणि विमान प्रवासाच्या तिकिटांवर होऊ शकतो.
5) अर्थसंकल्पामुळे शेअर बाजार आजही सुरू
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष बाब म्हणजे रविवार असूनही NSE आणि BSE शेअर बाजार नियमित वेळेत सुरू राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
एकूणच, 1 फेब्रुवारीपासून लागू झालेले हे 5 महत्त्वाचे नियम सामान्य नागरिकाच्या खिशावर थेट परिणाम करणारे ठरत असून, दैनंदिन जीवनात त्याचे पडसाद उमटणार आहेत.









