उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदासाठी खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावावर पक्षात एकमत झाले असून, शनिवारी (31 जानेवारी) ही निवड औपचारिकरित्या जाहीर केली जाणार आहे.
शनिवारी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्ष नेत्या म्हणून निवड निश्चित केली जाईल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता लोकभवन येथे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीनंतर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून इतिहास घडवणार आहेत.
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. मात्र या संकटाच्या काळात पक्षाने नेतृत्वातील पोकळी भरून काढण्यासाठी जलद हालचाली सुरू केल्या. विधिमंडळ पक्षाचा नेता हा पवार कुटुंबातीलच असावा, अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतली होती. त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले आहे.
या निर्णयासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या राजकीय हालचालींमुळे राज्याच्या सत्तासमीकरणांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.









