ग्रामपंचायत निवडणुका 2026 लांबणीवर! राज्यातील हजारो गावांवर प्रशासक बसणार, ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गोंधळ अजूनही कायम आहे. आरक्षणाच्या मुद्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर गेल्यानंतर आता Gram Panchayat Election 2026 बाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर थेट प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे किमान सहा महिने ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे.

ग्रामविकास विभागाचे अपर सचिव यांनी यासंदर्भात आदेश काढले असून हे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत. 14 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयानुसार प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय कारभार सुरू ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

विभागनिहाय प्रभावित ग्रामपंचायतींची संख्या

अमरावती विभागात तब्बल 2451 ग्रामपंचायती, नागपूर विभागात 1508 ग्रामपंचायती, कोकण विभागात 798 ग्रामपंचायती, नाशिक विभागात 2476 ग्रामपंचायती, पुणे विभागात 2870 ग्रामपंचायती, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 4134 ग्रामपंचायती या निर्णयामुळे प्रभावित होणार आहेत.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना मोठा ब्रेक बसणार आहे. स्थानिक पातळीवर निवडणुकांची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दुसरीकडे प्रशासनाला मात्र या कालावधीत ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

आता ग्रामपंचायत निवडणुका नेमक्या कधी होणार, याकडे राज्यभरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. पुढील काही महिन्यांत सरकारकडून यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

Leave a Comment