बस स्टँडवर हरवलेली 2.15 लाखांची सोन्याची पर्स पोलिसांनी शोधून मालकिणीला परत केली

अकोट शहरात पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि सीसीटीव्ही तपासामुळे मोठा दिलासा देणारी घटना समोर आली आहे. 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास अवधूत कॉलनी, अकोट येथील रहिवासी सौ. गायत्री पवन केंद्रे यांची सोन्या-चांदीचे दागिने असलेली पर्स बस स्टँड परिसरात नकळत गाडीच्या दरवाज्यातून खाली पडली होती. या पर्समध्ये 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पट्टा पोथ (किंमत अंदाजे 2 लाख रुपये) आणि 15 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या तोरड्या असा एकूण 2 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज होता.

घरी पोहोचल्यानंतर ही बाब लक्षात येताच सौ. केंद्रे आणि त्यांचे पती पवन केंद्रे तातडीने अकोट शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी तक्रार नोंदवताच डीबी पथकाने बस स्टँड तसेच शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तपासादरम्यान एमएच 30 बीके 3811 क्रमांकाच्या मोटारसायकलवरील व्यक्ती पर्स उचलताना दिसून आली.

पोलिसांनी त्वरित कारवाई करत आकाश अरुणराव बरींगे (रा. वडगाव रोठे, ता. तेल्हारा, जि. अकोला) याचा शोध घेऊन त्याला पोलीस ठाण्यात बोलावले. त्याने पर्स पोलिसांकडे सुपूर्द केली. त्यानंतर मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या हस्ते सर्व दागिने सौ. गायत्री केंद्रे यांना परत करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल माळवे, डीबी पथक प्रमुख वैभव तायडे आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली. या घटनेमुळे अकोट पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment