Ads

----

अकोला महापालिकेत सत्ता संघर्ष टोकाला… आज 11 वाजता वंचितचा निर्णय, शहराचं लक्ष लागलं!

By Nilesh Sir

January 23, 2026 9:17 am

Ads

अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली राजकीय चढाओढ आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडून सत्ता मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून, राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

आज सकाळी 11 वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला असून, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपली अंतिम भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण अकोला शहराचे लक्ष लागले आहे.

सध्या महापालिकेतील आकडेमोड अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पाच नगरसेवकांचे संख्याबळ या सत्तासंघर्षात किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. या चर्चेमधून कोणता राजकीय तोडगा निघतो, यावर सत्ता स्थापनेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दुसरीकडे भाजपकडूनही हालचालींना वेग आला असून, संख्याबळ मजबूत करण्यासाठी विविध पातळ्यांवर संपर्क सुरू आहेत. त्यामुळे अकोला महापालिकेतील राजकारण अधिक रंगतदार होताना दिसत आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, वंचित बहुजन आघाडीचा निर्णय हा सत्ता स्थापनेचा कळीचा मुद्दा ठरणार आहे. अल्टिमेटम संपल्यानंतर वंचितची भूमिका स्पष्ट होताच अकोला महापालिकेच्या सत्तेचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं.

आता सर्वांचे लक्ष एकाच प्रश्नाकडे लागले आहे…
अकोला महापालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार?
याचा फैसला पुढील काही तासांत होण्याची शक्यता आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!