अकोल्यात राजकीय गणित उलटले! हिवरखेड नगर परिषदेत भाजप उमेदवारासाठी काँग्रेस–MIM ची ‘अनपेक्षित’ साथ

राज्यात अनैसर्गिक युतींवर पक्ष नेतृत्वाकडून थेट बंदी घालण्यात येत असतानाच अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगर परिषदेत (Hiwarkhed Municipal Council) राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराला थेट काँग्रेसचा सूचक आणि एमआयएमचा अनुमोदक मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हिवरखेड नगर परिषदेत विविध समित्यांच्या निवडणुका पार पडत असताना बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपकडून अनिता वाकोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्या नामनिर्देशन पत्रात काँग्रेसच्या नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान यांचे नाव सूचक म्हणून, तर एमआयएमचे नगरसेवक आजम खान सुभेदार खान यांचे नाव अनुमोदक म्हणून नोंदवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी राज्यभरात त्यांच्या नगरसेवकांना अशा प्रकारच्या युती टाळण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तरीही हिवरखेडमध्ये प्रत्यक्षात वेगळेच चित्र पाहायला मिळाल्याने पक्षशिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकारानंतर विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली असून, “पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणावर संबंधित पक्ष नेतृत्व कोणती भूमिका घेतं आणि पुढे काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण अकोला जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Leave a Comment