अकोला जिल्ह्यात प्रेमसंबंधांच्या आड लपलेली फसवणूक आणि विश्वासघाताची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. लग्नाचे खोटे आश्वासन देत एका तरुणीचा दीर्घकाळ भावनिक आणि शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने प्रेमाच्या नावाखाली तिचा विश्वास संपादन केला. उज्वल भवितव्याचे स्वप्न दाखवत लग्नाचे आश्वासन देण्यात आले. मात्र या नात्याचा गैरफायदा घेत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. पुढे पीडिता गर्भवती झाल्यानंतर आरोपीने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी लग्नास स्पष्ट नकार देत सर्व संबंध तोडले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडितेने धैर्याने पुढे येत मुर्तीजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येत असून प्रकरण अधिक संवेदनशील आणि गंभीर असल्याचे संकेत मिळत आहेत.
या गुन्ह्याची नोंद महिला हवालदार शालिनी सोळंके यांनी केली असून प्रत्यक्ष तपास हेड कॉन्स्टेबल श्याम मडावी करीत आहेत. संपूर्ण तपास प्रक्रिया मुर्तीजापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुरावे संकलन, जबाब नोंद आणि तांत्रिक तपास वेगाने करण्यात येत आहे.
या प्रकरणामुळे समाजात प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.









