अकोट नगरपरिषदेतील सत्तेच्या राजकारणात अचानक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला असून, चर्चेत असलेली भाजप–एमआयएम युती काही दिवसांतच कोसळल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अकोल्यातील अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी करण्यात आलेली भाजप आणि एमआयएम (MIM) यांची चर्चेत राहिलेली, आणि अनेकांना आश्चर्यचकित करणारी युती अखेर काही दिवसांतच कोसळली आहे. वैचारिक मतभेद, तीव्र राजकीय टीका आणि अंतर्गत अस्वस्थतेमुळे एमआयएमने ‘अकोट विकास मंच’मधून अधिकृतपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

एमआयएमकडून अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत पत्र सादर करण्यात आले होते. या पत्रात एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी आपण ‘अकोट विकास मंच’मधून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट नमूद केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्राची दखल घेत एमआयएमला युतीतून बाहेर पडण्यास मान्यता दिली. यामुळे भाजप–एमआयएम युती आता कागदोपत्री आणि राजकीयदृष्ट्या पूर्णतः संपुष्टात आली आहे.
या घडामोडींमुळे अकोट नगरपालिकेतील सत्तेचे समीकरण बदलले आहे. भाजपच्या माया धुळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या असल्या, तरी एमआयएमच्या बाहेर पडण्यामुळे भाजपची अडचण वाढली आहे. ३५ सदस्यीय नगरपरिषदेत भाजपचे सध्या केवळ ११ नगरसेवक आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला आता नव्या पाठिंब्याची गरज भासणार आहे.
आता प्रश्न असा आहे की भाजप पुढे कोणता नवा राजकीय पॅटर्न राबवणार? उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, की अपक्ष नगरसेवकांना सोबत घेण्याचा प्रयत्न होणार? की पुन्हा एखादा अनपेक्षित राजकीय प्रयोग पाहायला मिळणार? या सर्व घडामोडींमुळे अकोट नगरपालिकेतील राजकारण पुन्हा तापले असून, पुढील काही दिवसांत कोणता निर्णय होतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









