अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रचार सभेनंतर अकोल्यात मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली. सभा संपताच समर्थक आणि कार्यकर्त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेतल्याने परिसरातील परिस्थिती पूर्णतः नियंत्रणाबाहेर गेली. गर्दी आवरण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असून, या घटनेत धावपळ आणि चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. ओवेसी यांच्या भाषणानंतर अचानक मोठ्या संख्येने कार्यकर्ते स्टेजकडे धावल्याने कोणताही ठोस नियोजनाचा अभाव समोर आला. काही क्षणातच सभा परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला. यामुळे काही काळ अफरातफर माजली. चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची तारांबळ उडाल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गोंधळ वाढत असल्याचे पाहून खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसांच्या संरक्षणात सभास्थळावरून काढता पाय घेतल्याचे दिसून आले. भाषणादरम्यान व्यासपीठाकडे येण्याचे आवाहन करणे आणि त्यानंतर परिस्थिती बिघडताच तात्काळ निघून जाणे, यामुळे ओवेसी तसेच आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या घटनेनंतर मोठ्या प्रचार सभांमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, निवडणूक काळात अशा सभांचे नियोजन करताना प्रशासन आणि आयोजकांनी अधिक जबाबदारीने भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
